
>> प्रा. शरयू जाखडी
अनाम, अविनाशी, निरंतर, अनंत, अरूप अशा ईशशक्तीला सगुणाच्या साह्याने दृश्यरूपात न्याहाळणे ही मधुराभक्तीची उच्चतम पातळी आहे. कृष्णाची प्रिय सखी मीरा अशाच अलौकिक पातळीवर कृष्णाशी आत्मनिष्ठ होती. मीरेचा जन्म राजस्थानातील कुकडी या गावी राजघराण्यात झाला होता. ती लहान असताना एका योगी साधूने तिला कृष्णाची मूर्ती दिली. तेव्हापासून ती कृष्णाच्या प्रेमात पडली. मीरा पूर्णपणे कृष्णमय झाली होती. मेवाडच्य्य्य्या भोजराजाशी तिचे जनरीतीप्रमाणे लग्न लावून देण्यात आले. तथापि ती संसारात रमली नाही. ती स्पष्टपणे म्हणते, `मेरे तो गिरिधर गोपाल। दुसरा न कोई। जाको सर मोरमुकुट। मेरा पती वोही।’ पुढे राजा भोजराज य़ुद्धात मारला गेला. मीरा आता मुक्त होऊन साधुसंतांसमवेत मंदिरातून नृत्य गायन करीत कृष्णभक्तीत रममाण झाली. नंतर राजा पाम सिंह गादीवर आला. त्याला मीरेचे असे वागणे पसंत नव्हते. त्याने अनेक प्रकारांनी मीरेला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्याभोवती कृष्णकवच असल्य्याने त्य्याची दुष्ट कारस्थाने निष्प्रभ झाली. मीरा मेवाड सोडून वृंदावनला आली. तिचे गुरु संत रैदास होते. काहींच्या मते संत कबीरांनी तिला मार्गदर्शन केले. `कृष्णनिष्ठ आत्मानंदा गोकुळात नांदणारी मी गोपी आहे’ असे ती सांगत असे. शेवटी द्वारकेला द्वारकाधीशाच्या मंदिरात भजन करत ती कृष्णमय झाली.






























































