कृष्णा नदी प्रदूषणप्रकर : दत्त इंडियासह स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज-पाणीपुरवठा खंडीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृष्णा नदीप्रदूषणप्रश्नी सांगलीतील दत्त इंडिया (वसंतदादा कारखाना) कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या ‘स्वप्नपूर्ती शुगर्स’चा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. पाटबंधारे व महावितरण कंपनीने ही कारवाई केली.

कृष्णा नदीमध्ये मागील आठवडय़ात रसायनमिश्रित पाणी मिसळल्याने हजारो माशांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रश्नी विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठविल्याने त्याची दखल प्रदूषण मंडळाने घेऊन तातडीने दत्त इंडिया कंपनी व स्वप्नपूर्ती डिस्टिलरी बंद करण्याचे आदेश बजाविले होते. यासह त्यांचा पाणीपुरवठा व वीजपुरवठादेखील तोडण्याचे आदेश पाटबंधारे व महावितरणला देण्यात आले होते.

उन्हाळ्यामुळे सध्या कृष्णेच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. वसंतदादा साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टिलरी आणि साखर कारखान्याचे रसायनयुक्त पाणी प्रक्रिया केल्यानंतर रसूलवाडी आणि सांबरवाडी येथील शिवारात सोडले जाते. मागील आठवडय़ात कोयना आणि वारणातून पाणी सोडण्यात आले होते. नेमक्या त्याच वेळी कारखाना आणि डिस्टिलरीची पाइपलाइन फुटल्याने त्याचे पाणी शेरीनाल्यातून नदीत मिसळल्याचे समोर आले होते. यापूर्वीदेखील शेरीनाला प्रश्नावर सांगली महापालिका आणि विधानसभा निवडणुका लढविल्या गेल्या. मात्र, कोणीही सत्तेवर आले, तरी शेरीनाला प्रश्न सुटण्यास मुहूर्त लागला नाही. साहजिकच ठरावीक काळानंतर जिह्यातील विविध कारखाने, तसेच शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळल्याने मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना वारंवार घडतात. मात्र, यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई करीत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.

हजारोंच्या संख्येने मृत मासे नदीपात्रात तरंगत असल्याचे दिसताच विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन करून संबंधितांवर कारवाई करण्याचा रेटा लावला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाने साखर कारखाना व डिस्टिलरी प्रकल्पाचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण कंपनी व पाटंबधारे विभागाला दिले होते. या दोन्ही विभागांच्या अधिकाऱयांनी साखर कारखाना व डिस्टिलरीला भेट देऊन शुक्रवारी (17 रोजी) वीज व पाणीपुरवठा तोडल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला. त्यानंतर वीज खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.

महापालिकेवर ‘फौजदारी’ची टांगती तलवार

ह यापूर्वी ‘राजारामबापू’, ‘हुतात्मा’ या साखर कारखान्यांनी नदीत प्रदूषित पाणी सोडल्याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘राजारामबापू’ची 15 लाख, तर ‘हुतात्मा’ची सात लाखांची बँक हमी जप्त केली होती. आता कृष्णा नदीत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडत असल्याने महापालिकेवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारी का करू नये? अशा आशयाची नोटीस बजाविल्याने मनपावर फौजदारीची टांगती तलवार लटकत आहे. त्याप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळ काय ‘ऍक्शन’ घेणार, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.