
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची आज देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी आहे. मोदी सरकारशी मतभेद झाल्यानंतर या पदाचा राजीनामा अरविंद सुब्रह्मण्यम यांनी दिला होता. यामुळे हे पद रिक्त होते. त्यांच्या जागेवर कृष्णमूर्तींची नियुक्ती केली आहे.
हे महत्त्वाचे पद भरण्यासाठी सरकारने 30 जून रोजी अर्ज मागवले होते. आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये ऍनालिटिकल फायनान्स विभागात ते सध्या कार्यकारी संचालक आहेत. शिकागो-बुथ स्कूलची त्यांच्याकडे पीएच.डी. आहे. याचबरोबर आयआयटी, आयआयएम या संस्थांमध्ये त्यांचे शिक्षण झालेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणाचे तज्ञ म्हणून डॉ. सुब्रह्मण्यम यांचा लौकिक आहे.



























































