चव्हाट्यावरची कला

>> क्षितिज झारापकर (नाट्यकर्मी)

नाटक, मराठी अंतरंगातील भरजरी ठेवा. पैठणी, इरकली, कर्नाटकी कशिदा सारी कलाकारी या मखमाली शेल्यावर उमटते. एकवटते आणि महाराष्ट्र तृप्त होतो. कोरोनाच्या अभद्र काळात ही नाटकं थांबली. कलाकार, रसिक कासावीस झाले. यातूनही ‘नेटक’सारखा प्रयोग दिमाखात नेटवर अवतरला. आता पुढे…???

जगात कोरोना उद्भवला अणि जरा कुठे बाळसं धरणारं मराठी नाटक 21 मार्चला बंद झालं. खरं म्हणजे नाटक बंद झालं नाही, नाटय़गृहं बंद झाली. नाटक या कला प्रकाराला नाटय़गृहं आवश्यक नाहीत. नाटक ही खरं तर गावाच्या वेशीत चावडी, चव्हाटय़ावर सादर होणारी कला आहे. आपण टोलेजंग अणि सुखसोयींनी समृद्ध नाटय़गृहं उभारली आणि म्हणून आता नाटय़गृहांना नाटकांची गरज आहे. नाटक घडायला एक करणारा आणि एक पाहणारा असे दोनच घटक आवश्यक असतात ही मूलभूत बाब नाटय़कर्मी विसरून गेले. गेल्या सहा महिन्यांत नाटक पुन्हा सुरू कसं करायचं याचा विचार कुणीच केलेला नाही. नाटय़गृहं सुरू कशी व कधी होतील यावर मात्र ऊहापोह खूप झालाय.

काही रंगकर्मींनी आपल्या कलेला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे वेगळे प्रयत्न यादरम्यान केले खरे. यात आपली नाटकं त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा घाट घातला. धंद्याच्या दृष्टीने हे रास्त असलं तरी नाटक या कला प्रकाराचा एक पायाभूत गुण इथे नष्ट होतो. नाटक पाहताना दृष्टिकोन हा प्रेक्षक ठरवतात. अखंड रंगमंच त्यांच्या समोर खुला असतो आणि कोणत्या क्षणाला नेमकं त्यातलं काय टिपायचं हे प्रेक्षक ठरवतात. नाटक शूट करून दाखवलं की, दृष्टिकोन दाखवणाऱयाचा होतो. प्रेक्षकांनी काय पाहायचं हे तो ठरवतो. म्हणूनच मग नाटक नाटक राहत नाही. एक वाईट शूट केलेला सिनेमा होतो.

यात मात्र एक अपवाद आहे. हृषीकेश जोशी याने एक इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न केलाय. ‘मोगरा’ नावाचा एक संपूर्णपणे स्वतंत्र अणि परिस्थितीतून जन्माला आलेला एक नवीन कला प्रकार त्याने निर्माण केलाय. त्याला तो नेटक म्हणतो. नेटक हे नाटक, मोबाईल फिल्म, एमएमएस, अणि वेबकास्ट यांचे मीलन करून तयार झालेला ब्रॅन्ड न्यू कला प्रकार आहे. यात पाच वेगवेगळय़ा बॅकग्राऊंडच्या स्त्र्ायांच्या आत्मसंशोधनाचा प्रवास आहे. वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले, स्पृहा जोशी अशा मातब्बर अभिनेत्री स्वतःच्या घरातून एकपात्री स्वगतं सादर करतात, जी हृषीकेशने अत्यंत हुशारीने एकत्र गुंफली आहेत. प्रत्येक कलाकाराच्या घराची रचना समजून घेऊन मोबाईल, वेबकॅम, आयपॅड किंवा तत्सम कोणत्याही कॅमेऱयाचे दोन अँगल्स ठरवून – ज्यात एक मास्टर वाईड अँगल आणि एक क्लोज अप – रचनात्मक बांधणी त्याने साध्य केली आहे. या सगळ्याचं ऑनलाइन एडिटिंग करून ‘मोगरा’ हे नेटक सादर केलं जातं.

प्रेक्षकांनी ते नेटवर तिकीट काढून पाहायचं आहे. याचे तिकीट दर नेहमीच्या तिकीट दरांपेक्षा जास्त आहेत याचं कारण की, एका तिकिटात अख्खं कुटुंब किंवा एकापेक्षा अधिक लोक हे नेटक पाहू शकतात. झूम मीटिंगच्या प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारं नेटक हे पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱयात पाहता येऊ शकतं आणि या कला प्रकाराची खरी आर्थिक ताकद आहे. हा नवीन कला प्रकार पुढे अधिक दृष्यसबळ आणि खूप जास्त प्रगत होत जाईल यात शंका नाही आणि त्याचा जनक म्हणून हृषीकेश जोशी लक्षात राहील.

मूळ मुद्दा हा नाटक सुरू होण्याचा आहे. व्यावसायिक निर्माते हे 21 मार्चपूर्वी त्यांची सुरू असलेली नाटकं पुन्हा चालवण्याचा ध्यास घेऊन आहेत. ही नाटकं कोविडपूर्वी रचली गेली होती. ती तशीच पुन्हा करता येणं नजीकच्या काळात कठीण आहे. नाटक ही जिवंत कला आहे आणि म्हणूनच सादरीकरणात कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. चित्रपटाची गोष्ट वेगळी आहे. तिथे सादरीकरण निर्जीव चित्रांचं असतं, जे शूट करताना नियम पाळावे लागतात. म्हणूनच नाटक सुरू करण्यासाठी नाटय़कर्मींना आपलं क्राफ्ट रिडिझाइन करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या इंडस्ट्रीच्या भवितव्याचा विचार आपणच रंगकर्मी म्हणून करणे गरजेचे आहे. हे जेव्हा आपल्याला उमगेल, त्यानंतर दोन-चार महिन्यांत नाटक पुन्हा सुरू होऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या