कुडाळात 29 डिसेंबरपासून रोटरी महोत्सव

359

नगरपंचायत, कुडाळ व रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2019 दि. 29, 30 व 31 डिसेंबर या कालावधीत येथील कुडाळ हायस्कूलच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. नगरपंचायत व रोटरी क्लब प्रथमच एकत्रितपणे हा महोत्सव साजरा करीत आहे. सर्व नागरिकांना या महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. या महोत्सवामध्ये स्वच्छतेचे संदेश देण्याकरिता कुडाळ नगरपंचायत विशेष अभियान राबवणार अशी माहीती नगराध्यक्ष ओंकार तेली व रोटरी अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ येथे शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगरपंचायत व रोटरी क्लबच्यावतीने या महोत्सवाबाबतची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, मुख्याधिकारी नितीन गाढवे, रोटरी अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर, नगरसेविका सौ.संध्या तेरसे व मेघा सुकी, नगरसेवक राकेश कांदे, पल्लवी बोभाटे आदी उपस्थित होते.

या महोत्सवाच्या निमित्ताने सर्व उद्योजकांना आपल्या उत्पादनाची जाहिरात व विक्री करण्यासाठी एक संधी निर्माण होणार आहे तसेच उद्योजकांना आपल्या मालाची हजारो ग्राहकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करून विक्री करण्यासाठी स्टॉल्स पण उपलब्ध केले जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी उत्कृष्ट रंगमंच व्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. या महोत्सवामध्ये नामांकित कंपन्यांच्या कार व टुव्हीलर एकत्रित पाहण्यासाठी आणि खरेदी करण्याची सुवर्णसंधी ‘ऑटो एक्सपो’ च्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विविध मालवणी, चायनीज, कोल्हापुरी व पंजाबी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील उपलब्ध असणार आहेत. दि. 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता इनरव्हील क्लब कुडाळच्या वतीने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगरपंचायत आणि रोटरी क्लबच्या वतीने नगराध्यक्ष ओंकार तेली व रोटरी अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या