
महसूल विभागाच्या पथकाने सरंबळ येथील कर्ली खाडीपात्रात धडक कारवाईची मोहीम राबवंत अनधिकृत वाळू उपसा करत वाळूने भरलेली बोट निकामी केली. हि कारवाई सोमवारी रात्री 8.15 वाजताच्या सुमारास सरंबळ खाडीपात्रात करण्यात आली असून यापुढील काळात कारवाईची ही मोहीम अधिक तीव्र करणार आहेत.
कर्ली खाडीपात्रात बेकायदा वाळूचे उत्खनन होत असल्याची माहिती कुडाळ महसूल विभागाला मिळाली. लागलीच महसूल विभागाच्या पथकाने सरंबळ येथे जाऊन धडक मोहीम राबविली. यावेळी कर्ली खाडीपात्रात बेकायदा वाळूने भरलेली एक बोट आढळून आली. ही बोट निकामी करून नष्ट करण्यात आली. तहसीलदार अमोल पाठक यांच्यासह वालावल मंडळ अधिकारी गुरखे, तलाठी सलगर, सोनवणे, मसुरकर आदींसह मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल उपस्थित होते. या कारवाईमुळे वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान तहसीलदार अमोल पाठक यांनी बेकायदा वाळू उत्खननाबाबत कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले.

































































