
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना अखेर शुक्रवारी ऑगस्टला हिंदुस्थानी दूतावासाची मदत मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर कुलभूषण यांना ही मदत मिळवून देण्यासाठी पाकिस्तान तयार झाला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी ही माहिती दिली.
हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. या निकालानंतर नरमलेल्या पाकिस्तानने कुलभूषण यांना हिंदुस्थानच्या दूतावासाची मदत मिळवून देण्यास तयारी दाखवली आहे. याबाबत हिंदुस्थानकडून गेल्या तीन वर्षांपासून मागणी केली जात होती. मात्र पाकिस्तानने कुलभूषण यांना राजनैतिक मदत देण्यास नकारघंटा वाजवली होती. कुलभूषण हे हिंदुस्थानी नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017मध्ये सुनावणी करून हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण यांना फाशी सुनावली होती.
हिंदुस्थानी गुप्तहेराला पकडल्याचा पाकिस्तानचा दावा
लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हिंदुस्थानी गुप्तहेराला पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला. डेरा गाझी खान शहरात पोलिसांनी काल एका हिंदुस्थानी नागरिकाला पकडले असून तो हेर असल्याचे त्याने मान्य केल्याचा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी पोलिसांच्या हवाल्याने केला. राजू लक्ष्मण असे या हेराचे नाव असून तो बलुचिस्तानमधून डेरा गाझी खान शहरात घुसला. त्याला अधिक चौकशीसाठी अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावली आहे.



























































