लोकाधिकार चळवळ हीच खरी लोकशाही – कुमार केतकर

शिवसेनेची लोकाधिकार चळवळ हीच खरी लोकशाही आहे असे प्रशंसोद्गार काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी यावेळी काढले. शिवसेनेच्या लोकाधिकार चळवळीतून प्रेरणा घेऊन देशाच्या इतर राज्यांमध्येच नव्हे तर अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्समध्येही लोकाधिकार चळवळी सुरू झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

हुतात्मा स्मारकातील शेतकरी आणि कामगाराच्या हाती मशाल आहे आणि आज शिवसेनेकडेही मशाल पुन्हा आली आहे. शेतकरी आणि कामगारांचे राज्य महाराष्ट्रात पुन्हा येणार याचे हे संकेत आहेत, असे कुमार केतकर यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातून उद्योगांच्या पळवापळवीवरून केतकर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. शिवरायांनी सुरत लुटली त्याचा गुजरातच्या मोदी-शहांना आकस आहे असे ते म्हणाले. गुजरातमध्ये अब्जावधी रुपये खर्चून गिफ्ट सिटी उभारण्यात आली आणि महाराष्ट्रातील उद्योग तिथे नेण्यात आले, पण कुणीही व्यापारी तिथे आता थांबायला तयार नाही. त्यांना मुंबईच योग्य वाटते, अशी वस्तुस्थितीही त्यांनी सांगितली. भाजप हा केवळ उत्तर हिंदुस्थानापुरता मर्यादित राहिला असून येत्या निवडणुकीत ते 230 चा आकडाही पार करू शकणार नाहीत, असे निरीक्षणही केतकर यांनी यावेळी नोंदवले.