
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच स्पर्धक जान सानू याने आपले वडील, प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘तुम्ही माझी जबाबदारी घेतली नाही. माझ्या संगोपनाबद्दल बोलायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही’ अशा शब्दांत जानने वडिलांना सुनावले आहे.
‘बिग बॉस’ या कार्यक्रमात मराठीचा अवमान केल्यामुळे स्पर्धक जान सानू याच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. त्यावेळी त्याच्यावतीने गायक कुमार सानू यांनी माफी मागितली होती. तसेच जान आणि त्याची आई आपल्यापासून वेगळे राहतात. त्याच्या आईने त्याच्यावर काय संस्कार केले आहेत हे मला माहीत नाही असे विधान केले होते. या वक्तव्यावर जानने नाराजी व्यक्त केली आहे. जान म्हणाला, आम्हा तिघा भावांचे संगोपन आमची आई रिटा भट्टाचार्याने केले. माझे वडील कधीही आमच्या आयुष्याचा भाग नव्हते. त्यांनी मला कोणत्या गोष्टीसाठी पाठिंबा दिला नाही.
आमची जबाबदारी घेतली नाही!
पुढे तो म्हणाला, इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटी आहेत जे घटस्फोट घेऊन दुसरा संसार थाटतात. पहिल्या पत्नीसोबत संबंध ठेवत नसले तरी मुलांची जबाबदारी मात्र स्वीकारतात. माझ्या वडिलांनी असे काहीही केले नाही. एकीकडे त्यांनी माझ्या संगोपनाबद्दल प्रश्न उपस्थित केले, दुसरीकडे त्यांनी माझ्या कामाची स्तुतीही केली आहे. माझ्याबद्दल त्यांच्या मनात संमिश्र भावना असून याबद्दल मी त्यांच्याशी नक्कीच चर्चा करेन असेही तो म्हणाला.



























































