
कुर्ला येथील ईएमयू कारशेड मध्ये ‘रक्षक’ नावाच्या वैद्यकीय सहाय्यक रोबोटची ‘इन हाऊस’ निर्मिती करण्यात आली आहे. हा रोबोट भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलला देण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल यांच्या हस्ते मुख्य वैद्यकीय संचालिका डॉ. मीरा अरोरा यांच्याकडे सीएसएमटी येथे काल झालेल्या कार्यक्रमात हा वैद्यकीय सहाय्यक रक्षक रोबोट सुपूर्द करण्यात आला.
कुर्ला कारशेडचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता सुनील बैरवा आणि त्यांच्या टीमने या रोबोटची ‘इन हाऊस’ निर्मिती केली आहे. हा वैद्यकीय सहाय्य रोबोट दूरस्थपणे डॉक्टर आणि रुग्णांमधला संवाद साधण्यासाठी तयार केला आहे. हा रोबोट शरीराचे तापमान, नाडी तपासणे, ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी तयार केला आहे. यातून स्वयंचलित सॅनिटायझर, इन्फ्रारेड सेन्सर या रोबोटमधून बाहेर येतो. तो रुग्णांना औषध व भोजन पोहोचवू शकतो आणि डॉक्टर आणि रुग्णांमध्ये एकमेकांशी व्हिडीओ संवाद घडवू शकतो. हा रोबोट 150 मीटर अंतरापर्यंत रिमोटद्वारे समपातळीच्या पृष्ठभागावर सर्व दिशेने काम करू शकतो.



























































