लोकलमध्ये मोबाईल लंपास करणार्‍या टोळीला अटक, कुर्ला रेल्वे पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकलमध्ये प्रवासात प्रवाशांचे मोबाईल लंपास करणार्‍या एका टोळीचा छडा कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी लावून त्यांच्याकडून 56,300 रुपये किंमतीचे सात मोबाईल हस्तगत केले आहेत.

कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक मोहिते व पाटील हे 9 एप्रिल रोजी रात्री सवा नऊच्या सुमारास कुर्ला स्थानकाच्या फलाट क्र.5 वर गस्त घालत असताना तीन इसम गर्दीत संशयास्पदरित्या हालचाल करताना त्यांना दिसले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल विचारे, जाधव, पाटील यांनी तिघांना ताब्यात घेतले. या तिघांची आरोपींची नावे उपेंद्र महेंद्र पवार (22), रवींद्र महेंद्र पवार (20) आणि अर्जुन शैलराव पवार (20) अशी असून त्यांची पंचासमक्ष पोलीस हवालदार शिंदे यांनी झडती घेतली असता आरोपी उपेंद्र पवार याच्याकडे तीन, रवींद्र याच्याकडे दोन अर्जुन पवार याच्याकडे दोन, असे सात मोबाईल सापडले.

पोलिस निरीक्षक ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी 8 व 9 एप्रिल रोजी कुर्ला पोलीस ठाणे हद्दीत लोकल ट्रेनमध्ये हे मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली आहे. यातील तीन फोन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले, तर उर्वरित चार तक्रारदार फिर्यादी यांना पोलीस ठाणे येथे बोलावून पडताळणी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप शिंदे करीत आहेत.