
अतिवृष्टीत बंद होणाऱया मध्य रेल्वेला या वर्षी मोठा दिलासा मिळणार आहे. पालिका आणि रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी रेल्वे रुळांवर ड्रेनेज बॉक्स बसवण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असून ड्रेनेज बॉक्समध्ये जमा होणारे पाणी पंपाद्वारे मिठी नदीत सोडण्यात येणार आहे. यासाठी धारावी पिवळा बंगल्यापासून 400 मीटर लांब टी जंक्शन येथे पंपिंग स्टेशन बांधण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
मुंबईत 18 व 19 जून 2015 रोजी मुसळधार पाऊस झाला आणि मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली होती. शीव पूर्वेकडील मुख्याध्यापक भवन परिसर, गुरुनानक शाळा, धारावी धोबीघाट आणि शीव ते माटुंगा रेल्वे स्थानकामधील रेल्वे रुळांवरील पावसाळी पाण्याचा निचरा जलदगतीने होणे व नागरिकांना पूरस्थितीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागाने या परिसराची पाहणी होती. या पार्श्वभूमीवर पालिका उपाययोजना करीत आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आराखडा-2 मध्ये सुचविल्यानुसार व पालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार मे. एम. डब्ल्यू. एच (इंडिया) प्रा. लि. कंपनीने केलेल्या सुधारित मसुदा आराखडय़ानुसार धारावी, एम. जी. रोड व संत रोहिदास मार्गावर पिवळा बंगला तेथील नवीन पातमुखापर्यंत 4 मी.x2 मी. आकाराच्या सलोह सिमेंट-काँक्रीट पेटिकेचे बांधकाम प्रस्तावित केले होते. मात्र धारावी पिवळा बंगला येथे पंपिंग स्टेशन बांधण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर पिवळा बंगल्यापासून 400 मीटर लांब पंपिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरू आहे. शीव, माटुंगा व कुर्ला स्थानकादरम्यान रुळांवर ड्रेनेज बॉक्स बसवण्याचे काम सुरू असून ड्रेनेज बॉक्समध्ये जमा होणारे पावसाचे पाणी पंपाद्वारे मिठी नदीत सोडण्यात येणार आहे, अशी माहिती वेलरासू यांनी दिली.

























































