कुरुळमध्ये साकारणार स्मृतीवन आणि चिडीया घर उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिबाग शहराला लागून असलेल्या कुरुळ ग्रामपंचायतीने पर्यटन वाढीसाठी पावले उचलली आहेत. ग्रामपंचायत हद्दीत रसायनी टेकडीवर असलेल्या सामाजिक वनीकरण विभागच्या 16 हेक्टर जमिनीवर स्मृतीवन आणि आंतरराष्ट्रीय पक्षी चिडीया घर संकल्पना प्रकल्प हाती घेतला आहे. सामाजिक वनीकरणाची 16 हेक्टर जागा प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीला देण्याबाबतची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. स्मृतीवन आणि चिडीया घर उपक्रम राबविणारी कुरुळ ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कुरुळ मधील पर्यटन वाढीस मदत मिळणार आहे.

कुरुळ ग्रामपंचायतीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच ऍड. जनार्दन पाटील यांनी दिली. यावेळी उपसरपंच स्वाती पाटील, सदस्य मनोज ओव्हाळ आणि इतर सदस्य उपस्थित होते. सामाजिक वनीकरण विभागला कुरुळ ग्रामपंचायत हद्दीतील स. नं 49/1 ही 16 हेक्टर जागा स्मृतीवन म्हणून विकसित करण्यासाठी 1998-99 साली देण्यात आली होती. मात्र सामाजिक वनीकरण विभागाने 20 वर्षात कोणतीही कामे अगर देखभाल केलेली नाही. कुरुळ ग्रामपंचायतीचे सरपंच ऍड जनार्दन पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून सदर जागा ग्रामपंचायतीला स्मृतीवनासाठी देण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक वनीकरण विभाग अधिकारी, अलिबाग तहसीलदार, सरपंच यांची एकत्रित बैठक होऊन सदर जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत. अशी माहिती जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

16 हेक्टर जागेवर स्मृतीवन तयार करण्यात येणार असून वाढदिवस, मृत व्यक्तीची आठवण जागृत ठेवण्यासाठी वृक्षरोपण करण्याची संकल्पना असून यासाठी दोन हजार रुपये कायमस्वरूपी वृक्ष देखभालीसाठी ग्रामपंचायत घेणार आहे. तसेच चिडीया घर बनविण्यात येणार असून यामध्ये आंतरराष्ट्रीय पक्षी पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. येणाऱ्या पर्यटकांना झोपडी पद्धतीचे राम, लक्ष्मण, सीता आश्रम वास्तव्यासाठी बनविण्यात येणार आहेत. तसेच गार्डनही बनविण्यात येणार आहेत. सैन्य दलातील व्यक्तींना व त्याच्या पालकांना मोफत राहण्याची सुविधा गेस्ट हाऊसमध्ये करण्यात येणार आहे.

स्मृतीवन आणि चिडीया घर उपक्रम पूर्ण करण्यासाठी एक ते दीड वर्ष कालावधी लागणार असून पन्नास ते साठ लाखाचा खर्च होणार आहे. यासाठी आमदार निधी, फॉरेस्ट टुरिझम निधी, 15 वित्त आयोग, आरसीएफ, व अन्य देणगीदारांच्या मार्फत निधी उभा केला जाणार असल्याचे सरपंच ऍड जनार्दन पाटील यांनी सांगितले. या सर्व प्रकल्पाची देखभाल ही ग्रामपंचायत करणार आहे. फॉरेस्ट टुरिझम माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून यामुळे पर्यटक वाढले जाणार असून त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनाही आर्थिक फायदा होणार आहे. कुरुळ मध्ये पर्यटन वाढावे या माध्यमातून हा प्रकल्प हाती घेतला असल्याचे ऍड जनार्दन पाटील यांनी सांगितले.