
कामगार हा कामगार आहे. तो गुलाम नाही. न्याय्य हक्क देऊन त्याचा सन्मान राखला जाणार नसेल तर त्यासाठी आपल्याला लढावे लागले तरी लढू, असे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने दिला जाणारा गं. द. आंबेकर जीवनगौरव पुरस्कार कडू यांच्या हस्ते आज कामगार नेते विश्वास उटगी यांना देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाच गुणवंत कामगारांना श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संघटनेचे आद्य संस्थापक आणि कामगारमहर्षी गं. द. आंबेकर यांच्या 56व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून परळच्या महात्मा गांधी सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जीवनगौरव पुरस्कारासाठी 41 हजार तर पाच श्रम गौरव सन्मानित कामगारांना प्रत्येकी 30 हजारांचा धनादेश देण्यात आला. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर, एनटीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक किशोर पवार, आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजचे प्राचार्य केतन सारंग, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, माजी नगरसेवक सुनील अहिर आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ ऊर्फ अण्णा शिर्सेकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.


























































