मूळ गावी परतण्यासाठी कोल्हापूरातील परप्रांतीय मजुरांमध्ये अस्वस्थता; प्रशासनाची धावपळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात दोन महिन्यांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजूर, कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात मूळ गावी पाठविण्यात येत आहे. तीन दिवसांत पाच हजारहुन अधिक परप्रांतियांना श्रमिक रेल्वेने रवाना करण्यात आले आहे. मात्र, सर्वांनाच मूळ गावी जाण्याची ओढ लागल्याने कोल्हापूरातील मजूरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे. जिल्हा प्रशासनातील समन्वयाच्या अभावाने जिल्ह्यात ठिकठिकाणी मजुरांचा संयम सुटत असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी रास्ता रोको करून तर कुठे बाडबिस्तारा गुंडाळून हजारोंच्या संख्येने मजूर आपापल्या गावी निघण्यासाठी रस्त्यावर उतरु लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाची धावाधाव होत आहे.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात सर्व उद्योग व्यवसाय बंद झाल्याने, त्यावर अवलंबून असलेले हजारो परप्रांतीय मजूर, कामगार बेरोजगार झाले आहेत. घरभाड्यासह इतर देणी भागविणे शक्य नसल्याने, काही मजुर मिळेल त्या वाहनाने गावी परतले आहेत. त्यात स्थानिक प्रशासनाकडुन ऑनलाईन अर्ज भरण्यात येणारे अडथळे आणि वागणुकीमुळे अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. अनेकजण राज्यात परतत असल्याने, जिल्ह्यातील इतर परप्रांतीयांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरत आहे. दोन दिवसांपूर्वी इंचलकरंजी येथे हजारो मजुरांनी रास्तारोको करुन आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतर आपापल्या राज्यात जाण्यासाठी नोंदणी केलेल्या आणि त्यांच्या राज्यातुन परवानगी मिळालेल्या परप्रांतीय मजूर,कामगार आदींना श्रमिक रेल्वेने रवाना करण्यात येत आहे.

मूळ गावी परतण्यासाठी मजूरांमध्ये अस्वस्थता आहे. उत्तर प्रदेशसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याचे समजल्याने शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतारांकित या तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात जाण्यासाठी शिरोली येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सकाळी 8 वाजेपासूनच एकत्र जमले होते. पोलिसांनी या मजुरांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपापल्या राहत्या ठिकाणी परत जाण्याची विनंती केली. काही परप्रांतीय पुन्हा आपल्या खोलीवरती परत गेले. मात्र काहींनी घरमालकाचे भाडे देऊन खोली सोडून बाहेर पडल्याने आता रस्त्यावर किंवा स्टेशनवर राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. तर काहींनी थेट पायी चालतच उत्तर प्रदेशला जाण्याची तयारी केली. हजारोंच्या संख्येने मजूर बाहेर पडल्याने, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल ते सांगली फाटा मार्गावर परप्रांतीय मजुरांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. कित्येकजण बाडबिस्तारा घेऊन बायकां मुलांसह चालत पुण्याच्या तर काही मजूर चालत कोल्हापूर रेल्वे स्टेशनकडे गेले. पोलिसांनी शिरोली येथे या मजुगारांना रोखले.यावेळी वादावादी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हाधिकारी दौलत देसाई तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना या मजुरांना समजवण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही या सर्वांची मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगितले, त्यानंतर मजूरांमधील अस्वस्थता कमी झाली आहे.