
ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात त्याच्या घरात घुसून अमेरिकेच्या नौदल सैनिकांनी ठार केल्याच्या घटनेला आठ वर्षे उलटली असली तरी आपल्याकडे आसाममध्ये ‘लादेन’ नावाची दहशत अजूनही कायम आहे. गेल्या काही दिवसांत तर येथील लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, ‘लादेन पकडला गेला का…?’ कारण येथील गोलापोरा भागात एका रात्रीत या लादेनने पाच निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. हा लादेन दुसरा तिसरा कुणी नसून एक पिसाळलेला हत्ती आहे.
तब्बल 8 वन अधिकारी या जंगली हत्तीचा शोध घेत असून त्यासाठी येथील सतबारी जंगलाचा प्रत्येक भाग ड्रोन कॅमेऱयाच्या सहाय्याने पिंजून काढला जातोय. या हत्तीने आणखी कुणाचा जीव घेण्याआधीच त्याला पकडण्याचा या वन अधिकाऱयांचा विचार आहे, पण तो पकडला गेलेला नसल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.
वर्षभरात हत्तींच्या हल्ल्यात 57 जणांनी जीव गमावला
वन विभागाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, या वर्षभरात जंगली हत्तींच्या हल्ल्यात आतापर्यंत 57 जणांनी जीव गमावला आहे. याच वर्षी जुलैमध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयाने याबाबतची आकडेवारी लोकसभेत सादर करताना म्हटले होते की, अन्य राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये हत्तींच्या हल्ल्यात मारले जाणाऱयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.






























































