
लाडकी बहीण योजनेत नियमबाह्य पद्धतीने अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे परत घेण्याची घोषणा महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) खासदार अमोल कोल्हे यांनी घणाघाती टीका केली असून या अपात्र ठरलेल्या बहिणींनी दिलेली मतं सत्ताधारी पक्ष परत करणार आहे का, असा खोचक सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. महिलांना दर महिना दीड हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक असल्याने सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले. राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र या योजनेमुळे राज्याचे आर्थिक गणित कोसळल्याने निवडणुकीतील विजयानंतर या योजनेतील अपात्र बहिणींचा सरकारने शोध सुरू केला आहे आणि निकषाबाहेर जाऊन लाभ घेतलेल्यांचे पैसे परत घेण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत.
याबाबत बोलताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, ‘निकषाबाहेरील तक्रारी आलेल्या अर्जांबाबत पडताळणी सुरू आहे. नियमबाह्य पद्धतीने अर्ज दाखल करणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहेत. शासनाने सुरुवातीला जो शासन निर्णय जाहीर केले त्यानुसारच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.’ सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ‘निवडणुकीपूर्वी घाईघाईने योजना आखून लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेणार आहेत मग या अपात्र बहिणींनी दिलेली मतं सत्ताधारी परत करणार आहेत का?’




























































