
सामना प्रतिनिधी, ठाणे
धावत्या लोकलमध्ये शिरून महिलांचे दागिने, मोबाईल हिसकवण्याचे प्रकार थांबलेले नसून अशीच एक थरारक घटना मुंब्य्रात घडली. ठाण्याहून कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यातून चोरट्याने एका मुलीचा मोबाईल हिसकावून चालत्या गाडीतून पळ काढला. धक्कादायक म्हणजे त्याला प्रतिकार करताना त्या मुलीचा तोल जाऊन ती लोकलमधून खाली पडली. सुदैवाने तिचे प्राण वाचले असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबरनाथ येथे राहणारी सुश्मिता ओनकार (28) ही आपली मैत्रीण ऋतुजासोबत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरी परतण्यासाठी लोकलने प्रवास करत होती. लोकल मुंब्रा स्थानकात येताच महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात एक तरुण चढला आणि त्याने सुश्मिताचा आयफोन हिसकावून घेतला. त्या दोघींनी चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना धक्का मारून चोरटा धावत्या लोकलमधूनच उडी मारून पसार झाला, तर दुसरीकडे या झटापटीत सुश्मिताचा तोल जाऊन ती फलाटावर पडली. जखमी अवस्थेतच प्रवाशांनी आणि पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख पटताच त्याला मुंब्य्रातील अमृतनगर येथून बेड्या ठोकल्या.
summary- lady fallen from local train

































































