Video – चंद्रपूरमध्ये खासगी रुग्णालयाकडून लूट, लाखो रुपयांचे दिले बील

चंद्रपूरच्या श्वेता हॉस्पीटल डॉ. रितेश दीक्षित यांचं आहे. इथं कोरोनामुळे दोन रुग्ण काल दगावले. डॉक्टरने प्रयत्न केले. पण तरीही त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा नातेवाईक मृतदेह घ्यायला गेले, तेव्हा डॉक्टरने जो काही व्यवहार केला, तो सर्व कॅमेरात कैद झाला.

या डॉक्टरने तब्बल चार लाख रुपयांचे बिल सांगितले. आधी तर छापील बिल द्यायला तो तयार नव्हता. तयार झाला तेव्हा एक लाख अधिकचे द्या म्हणून मागणी करू लागला. हे कशाचे पैसे म्हणून विचारणा केली, तर डॉक्टर दीक्षित म्हणतात मला मानसिक त्रास झाला, बीपी वाढला त्याचे. हे उत्तर ऐकून नातेवाईकांचा बीपी वाढला आणि शाब्दिक चकमक उडाली. मुळात, रुग्णाचा उपचार करताना कोणता डॉक्टर असे अतिरिक्त शुल्क घेतो? पण दीक्षित आपलं कर्तव्य विसरून लूट करायला निघाले आहेत. माझ्याकडे अमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ आहे, अशी धमकीही ते देऊ लागले. आता हा व्हीडीओ आम आदमी पक्षाने व्हायरल केला असून, रुग्णाला लुटणाऱ्या या रुग्णालयाची मान्यता काढून डॉक्टरची सनद काढून घेण्याची मागणी केली.

श्वेता हॉस्पीटल हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना वाढीव पैशांसाठी त्रास देण्याचे अनेक किस्से इथं घडले आहेत. आता हा पुन्हा एक प्रकार बाहेर आल्यावर कोरोना रुग्णांनी इथं जावं की नाही, असा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान, डॉक्टर दीक्षित यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितलं की, महागड्या औषधी आणि साहित्य असल्यानं एवढं बिल झालं.

कोरोना रुग्णांचे इतर हॉस्पिटलचे बिल आतापर्यंत जास्तीतजास्त दीड-दोन लाखांच्या जवळपास बघायला मिळाले. पण श्वेता हॉस्पीटलने दिलेले चार लाखांचे बिल डोळे विस्फारणारे आहे. अशा बिलांच्या संदर्भात आता संबंधित शासकीय यंत्रणेने चौकशी करण्याची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या