कंदिलावर जरतारीचा मोर नाचरा हवा… पर्यावरणपूरक दिवाळीसाठी लालबागमधील दांपत्य सरसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. घरासह संपूर्ण अंगण प्रकाशमय करणाऱया आकाशकंदिलांना दिवाळीमध्ये मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांत चायना मेड प्लॅस्टिक कंदिलांना फाटा देत आपल्या संस्कृती अन् परंपरेचे दर्शन घडविणाऱया पर्यावरणपूरक कंदिलांची क्रेझ वाढत आहे. ग्राहकांची हीच मागणी पूर्ण करण्यासाठी लालबागमधील अभिषेक आणि हर्षदा साटम हे दांपत्य सरसावले आहे. त्यांनी ‘हर्षाभि क्रिएशन्स’अंतर्गत महाराष्ट्राचे महावस्त्र असलेल्या पैठणी साडय़ांपासून पारंपरिक आकाशकंदील तयार केले आहेत. राजेशाही थाटातले हे कंदील सगळ्यांचे लक्ष वेधत आहेत. विशेष म्हणजे हे पंदील दीर्घकाळ टिकणारे असल्यामुळे दरवर्षी नवीन कंदील घेण्याची गरज नाही.

पर्यावरणपूरक दिवाळीची कास धरत कागद आणि लाकडाला पैठणी साड्यांची जोड देत हे दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून राजेशाही कंदील तयार करत आहे. कंदिलांना जरीच्या साडय़ा, खण यांची सजावट केली जाते. अत्यंत आकर्षक दिसणाऱया या कंदिलांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याबाबत अभिषेक साटम म्हणाला, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मी लहानपणापासून कंदील बनवत आहे. कंदील टाकून न देता त्याला पुन्हा नावीन्यपूर्ण रूप देत कसे वापरता येईल याचे धडे मी वडिलांकडून गिरवले. आपले सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. त्यानुसारच वर्षानुवर्षे वापरता येईल असा कंदील तयार करण्याचे डोक्यात होते.

पुढे तो म्हणाला, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोप पावत चाललेली आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आम्ही पारंपरिक आकाशपंदिलाला पैठणीचा साज चढवला आहे. आपला पंदील सगळ्यांपेक्षा हटके असावा असे प्रत्येकाला वाटते. त्यानुसार आम्ही तयार केलेला प्रत्येक कंदील हा वेगळ्या डिझाईनचा असतो.