‘लालबागच्या राजा’ने उत्सव साजरा करण्याची दिशा दिली! आरोग्य उत्सवाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लालबागचा राजा’ हा केवळ मुंबईतील भक्तांसाठीच मर्यादित नसून जगभरात श्रद्धास्थान आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी राखत अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. दुष्काळग्रस्तांना मदत असो, रक्तदान असो, विद्यार्थ्यांना मदत असो तसेच आता आयोजित करण्यात आलेला आरोग्य उत्सव असो लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने उत्सव साजरा करण्याची एक दिशा दिली आहे. त्याचे सर्वच मंडळे निश्चित अनुकरण करतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी ‘आरोग्य उत्सवा’च्या उद्घाटनाप्रसंगी केले.

लालबागचा राजाच्या वतीने यंदा प्लाझ्मादान तसेच आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या समाजोपयोगी उपक्रमाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांनी केले. गलवान खोर्‍यात चीन सैनिकांविरोधात लढताना प्राणांची बाजी लावणार्‍या 22 जवानांच्या कुटुंबीयांचा दोन लाख रुपये तसेच शौर्यचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना लढय़ात प्राणांची बाजी लावणार्‍या पोलिसांच्या कुटुंबीयांना एक लाख आणि शौर्यचिन्ह देऊन शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी, लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानद सचिव सुधीर साळवी यांनी केले.

मुंबई पोलीस हा सर्वांच्या कुटुंबातला एक घटक

मुंबई पालीस यांनी एक इतिहास निर्माण केला. मुंबईच्या शेवटच्या माणसालाही तो आपलासा वाटतो. मुंबई पोलीस सर्वांच्याच कुटुंबाचा घटक झाला आहे. वेळेची मर्यादा नाही 24 तास काम, कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. असे असताना आपल्या सर्वांचे संरक्षण करण्याचे काम ते अखंड करतात, अशा शब्दांत पवारांनी पोलिसांच्या कार्याचा गौरव केला.