
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांना महाआघाडीत पुन्हा सहभागी व्हायचे होते. मात्र, त्याला आपण नकार दिल्याचा दावा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. लालूप्रसाद यादव यांचे ‘गोपालगंज टू रायसीना : माय पॉलिटिकल जर्नी’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.
महाआघाडीत पुन्हा सहभागी होण्यासाठी नितीश कुमार यांनी त्यांचे सहकारी प्रशांत किशोर यांना पाचवेळा आपल्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. मात्र, नितीश कुमार यांनी पुन्हा महाआघाडीत घेण्यास आपण नकार दिल्याचे लालू यांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांनी आपला विश्वासघात केला होता. त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवणे शक्य नसल्याने आपण त्यांना महाआघाडीत घेण्यास नकार दिल्याचे लालू यांनी पुस्तकात म्हटले आहे. नितीश कुमार यांच्याबाबत आपल्या मनात कटुता नाही. मात्र, त्यांना महाआघाडीत घेतल्यास बिहारच्या जनतेला काय वाटेल याचा आपण विचार केला, त्यामुळे नितीश यांना आपण महाआघाडीत घेतले नाही असे लालू यांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांनी महाआघाडीत सहभागी होण्यासाठी आपला मुलगा तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी प्रशांत किशोर यांना पाठवले होते, असा दावाही त्यांनी केला आहे. नितीश महाआघाडीत सहभागी झाल्यास बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळेल आणि या दोन्ही राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल असा विश्वासही प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला होता. 2017 मध्ये तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश यांनी महाआघाडीतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी करून बिहारमध्ये सरकार स्थापन केले होते.
लालू प्रसाद यांनी पुस्तकात केलेले हे दावे बिनबुडाचे असल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. लालू यांनी फक्त चर्चेत राहण्यासाठी पुस्तकात असे खळबळजनक दावे केल्याचेही ते म्हणाले. जनतेने आपल्याकडे लक्ष द्यावे यासाठी लालूप्रसाद केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोपही किशोर यांनी केला आहे. लालूप्रसाद यांची आपण भेट घेतल्याचे किशोर यांनी मान्य केले. मात्र, त्या भेटीतील गोष्टी उघड केल्यास लालूप्रसाद यांच्या अडचणी वाढलील असा इशाराही त्यांनी दिला आहे.


























































