
22 जुलै 2021 ची काळरात्र.. तुफान कोसळणारा पाऊस, विजांचा राक्षसी कडकडाट, सोसाट्याचे वारे वहात असतानाच महाडच्या ‘तळीये’ गावावर डोंगरकडा कोसळला, अख्खं गाव चिखलात गाडलं गेलं. या दरड संकटात 86 जणांचा बळी गेला. या घटनेला चार वर्षे पूर्ण होत असली तरी अजूनही इतर गावांवर असलेला दरडींचा धोका टळलेला नाही. कोल गावातील गवळवाडीच्या शेजारी असलेल्या डोंगरमाथ्यांवरून मोठमोठे दगड निसटून वेगात गावाच्या दिशेने घोंघावले. सुदैवाने हे दगड गावावर येऊन कोसळले नाहीत. गावातील सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती पोस्ट केली. त्यानंतर प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या मोठमोठ्या दरडींचे छोटे तुकडे करून ते नष्ट करण्यात येतील, अशी माहिती स्थानिक तलाठ्यांनी दिली.
खोपोली काजूवाडीच्या सहकारनगरात दरड कोसळली
खोपोलीतील काजूवाडी सहकारनगर परिसरातील रहिवासी भागात दरड कोसळली. महाकाय दगड आणि मातीचे लोट या परिसरात आल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगरपालिका प्रशासनाने तातडीने धाव घेऊन दगड आणि माती हटवण्याचे काम सुरू केले. परंतु सहकारनगरावर ज्या टेकडीतून ही दरड कोसळली त्या टेकडीवर अर्धा ढिगारा अद्यापही अडकला असून तो केव्हाही पुन्हा या वस्तीवर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, तहसीलदार अभय चव्हाण यांनी भानवज मस्जिद ते सहकारनगर परिसराला भेट देऊन रहिवाशांना धीर दिला.