अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; विस्कळीत झालेली वाहतूक अल्पावधीत पूर्ववत

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. काहीवेळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने दरड हटवण्याचे काम तासाभरात सुरू करण्यात आले.

सततच्या पावसामुळे अणुस्कुरा घाट धोकादायक बनला होता. आज सकाळी अचानक घाटातील एका वळणावर माती आणि दगड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहनांच्या रांगा लागल्या. याच मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला. तसेच, बांधकाम विभागाला तातडीने कळवून दरड हटवण्यासाठी जेसीबी आणि इतर यंत्रणा पाठवण्याची विनंती केली.

पोलिसांच्या सुचनेनुसार आणि स्थानिक लोकांच्या मदतीने प्रथम एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. पुढील काळात पावसाचा अंदाज लक्षात घेता, अणुस्कुरा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, पर्यायी मार्गांचा वापर शक्य असल्यास तो करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संजय माने व पो.कॉ. सचिन बलीप यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेतला. रस्त्यावर पडलेले दगड व माती बाजूला करून तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या तत्परतेबद्दल प्रवाशांनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.