वसईत दरड कोसळली; चौघांना वाचवण्यात यश, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रस्ते खचण्याच्या आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी वसईमधील राजवलीच्या वाघरल पाडा या भागामध्ये दरड कोसळली. या दरडीखाली सहा जण अडकले असून चौघांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

अद्यापही दोन जण दरडीखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. स्थानिक पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेकाळेजवळ एमएमआरडीएच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. त्यानंतर कोणतीही संरक्षण भिंत येथे बांधण्यात आली नव्हती. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथे दरड कोसळली. त्यामुळे पालघर-मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे.