
गणेशोत्सव आठवडाभरावर आला असतानाच कुलाबा, फोर्ट, कफ परेड परिसरातील गणरायाच्या मोठय़ा मूर्तींच्या विसर्जनाचा पेच निर्माण झाला आहे. गेट वेच्या समुद्रात उंच मूर्तींचे विसर्जन करण्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कुलाबा परिसरातील 50 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पाचे विसर्जन कुठे करायचे? गेट वेचा परिसर की गिरगाव चौपाटी? याबाबत संभ्रमावस्थेत असून यावर तोडगा काढण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी पोलीस व पालिका दरबारी येरझाऱया घालत आहेत.
कोरोना काळात गणेशोत्सवावर काही निर्बंध आले होते. सरकारने मूर्तींच्या उंचीला चार फुटांची मर्यादा घालून दिली होती. दोन वर्षांनंतर ही मर्यादा हटवण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील मोठय़ा गणेशोत्सव मंडळांनी उंच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची तयारी केली. मात्र गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात गणपती विसर्जन करणारी मंडळे बीपीटीच्या भूमिकेमुळे बुचकळय़ात पडली आहेत. त्यांनी बुकिंग केलेल्या मोठय़ा उंचीच्या गणरायांच्या पारंपरिक विसर्जन सोहळय़ापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेट वे परिसरात फेरीबोटींची ये-जा असते. त्या पार्श्वभूमीवर गेट वे ऑफ इंडियाच्या जवळील समुद्रात चारहून अधिक फूट उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यावर बीपीटीने आक्षेप घेतला आहे. गणेशोत्सव समन्वय समितीने नुकताच हा मुद्दा पोलीस व पालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांपुढे उपस्थित केला आहे. कुलाबा, कफ परेड, पर्ह्ट परिसरातील जवळपास 52 गणेशोत्सव मंडळांच्या 10 ते 12 फूट उंचीच्या गणरायांचे वर्षानुवर्षे गेट वेच्या जवळील समुद्रात विसर्जन केले जाते. मग यंदाच येथील विसर्जनाला विरोध का, असा सवाल गणेशोत्सव मंडळे करीत आहेत. आम्ही उंच मूर्तींची योग्य ती काळजी घेऊन विसर्जन करू, अशी हमी देत मंडळ पदाधिकाऱयांनी पालिका प्रशासनाकडे परवानगीसाठी दाद मागितली आहे.
आम्ही वर्षानुवर्षे गेट वे परिसरात उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करतोय. आजपर्यंत कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. बीपीटीने येथील विसर्जनाला विरोध केल्यास 50 हून अधिक मंडळांना गिरगाव चौपाटीवर जावे लागेल. ते वाहतूककांडी व वेळेचा विचार करता सोयिस्कर ठरणार नाही. याबाबत पालिका व पोलीस प्रशासनाने वेळीच तोडगा काढावा.
- उल्हास चव्हाण, पदाधिकारी, मुंबईचा कृपाळू गणेशोत्सव मंडळ, कुलाबा
बीपीटीने गेट वे परिसरात उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनाला मनाई करीत तसे पत्र पालिका प्रशासनाकडे पाठवले आहे. गणेशोत्सव मंडळांचा त्यावर आक्षेप आहे. याबाबतीत मंडळांनी रितसर निवेदन द्यावे. त्यानुसार आम्ही बीपीटीशी पत्रव्यवहार करू.
- शिवदास गुरव, ए वॉर्ड अधिकारी, बृहन्मुंबई महापालिका

































































