
कोरोनामुळे लिलाव बाजार बंद असलेल्या नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या पहिल्याच लिलावासाठी एकतीस हजार कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्यास दोन हजारांचा भाव मिळाला आहे. चार तासांत 2 कोटी 60 लाखांची उलाढाल झाली.
पहिलाच लिलाव असल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत आवक सुरू होती. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजार येथील कांदा लिलाव व प्रसिद्ध असलेला जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता. साडेतीन महिन्यांत कांदा लिलावातून होणारी शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाली नसल्याने परिसरातील अर्थकारणावर परिणाम झाला. गावातील अनेक युवकांची रोजीरोटी बाजार व लिलावावर असल्याने अनेक कुटुंबे चिंतेत होती.
मंगळवारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत लिलाव झाले. तर बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटेपर्यंत बैलगाडी, ट्रॅक्टर व टेम्पोतून कांदा गोण्यांची आवक झाली. बाजार समितीचे कर्मचारी, आडतदार, हमाल आणि शेतकऱ्य़ांची लगबग पाहण्यास मिळाली. व्यवहार सुरळीत होणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. पावसामुळे आवारात दलदल झाल्याने वाहने ये-जा करताना रखडत होती.
सकाळी सात वाजता प्रत्यक्ष लिलाव सुरू झाले. लिलावास शेतकऱ्य़ांची संख्या कमी होती. गुरुवारी 31 हजार 611 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्यास क्विंटलला अठराशे ते दोन हजार भाव मिळाला. दोन नंबर कांद्यास चौदाशे ते सोळाशे तर तीन नंबरला पाचशे ते एक हजाराचा भाव मिळाला. चार तासांत 2 कोटी 60 लाख 79 हजारांची उलाढाल झाली.


























































