कश्मीरात दहशत माजवण्याचा कट पोलिसांनी उधळला, आठ दहशतवाद्यांना बेड्या

434

जम्मूकश्मीरमधील कलम-370 हटवल्यापासून चवताळलेल्या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी आता कश्मीरात कुरापती सुरू केल्या आहेत. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरातील नागरिकांना धमकीचे पोस्टर्स वाटून दहशत निर्माण करणार्‍या लश्करतोएबाच्या आठ दहशतवाद्यांना पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. दहशतवाद्यांचा कोणताही मनसुबा उधळून लावण्यासाठी हिंदुस्थानच्या सुरक्षा यंत्रणा कश्मीर खोर्‍यात जागता पहारा देत आहेत.

दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी सोपोर परिसरातीलच एका फळ व्यापार्‍याच्या घरावर हल्ला केला होता. त्यात दोन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांच्या या वाढत्या कुरापती लक्षात घेऊन कश्मीर खोर्‍यात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. याच दरम्यान दहशतवाद्यांनी नागरिकांना धमकीची पोस्टर्स वाटून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘लश्करतोएबाचा हा प्रताप असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम तीव्र करून आठ दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. एजाज मीर, उमर मीर, तौसीफ नजर, इम्तियाज नजर, उमर अकबर, फैजान लतीफ, दानीश हबीब आणि शौकत अहमद मीर अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्या अटकेबरोबरच धमकीची पोस्टर्स तयार करण्यासाठी वापरलेले संगणक तसेच इतर वस्तूही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

त्यातिघांचा शोध सुरू

लश्करतोएबाच्या आणखी तीन दहशतवाद्यांच्या सूचनेवरून कश्मीरातील नागरिकांना धमकीचे पोस्टर्स वाटले गेल्याचे उघडकीस आले आहे. त्या तिघांना तातडीने शोधून काढण्यासाठी पोलीस सध्या अटक केलेल्या आठ जणांची कसून चौकशी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी फळ व्यापार्‍याच्या घरावर झालेला हल्ला व त्यानंतर धमकीची पोस्टर्स वाटण्याच्या कुरापतींमुळे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या