पाकिस्तान ‘गजवा-ए-हिंद’साठी सज्ज; लष्कर-ए-तोयबाने हिंदुस्थानविरोधात ओकली गरळ

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली आहे. लष्करचा बहावलपूरचा प्रमुख सैफुल्लाह सैफ याने ‘गजवा-ए-हिंद’ ची घोषणा करत हिंदुस्थानला उघडपणे धमकी देत गरळ ओकली आहे. पाकिस्तानी सैन्य गजवा-ए-हिंदसाठी सज्ज आहे, असे सांगत त्याने पंतप्रधान मोदींसह हिंदुस्थानातील नेत्यांना धमकी दिली आहे. हिंदुस्थानविरुद्ध जिहाद करण्याची वेळ आली आहे, अशी दर्पोक्तीही त्याने केली आहे.

प्रादेशिक समीकरणे बदलत आहेत आणि बांगलादेश पाकिस्तानसोबत उभा आहे, असे सांगत त्याने हिंदुस्थानविरोधात ‘गजवा-ए-हिंद’चा नारा दिला. यासाठी पाकिस्तानी सैन्य सज्ज असल्याचेही तो म्हणाला. दहशतवाद्यांनी पुढे येत हिंदुस्थानविरुद्ध मोठे हल्ले करण्याचे आवाहन करत त्याने चिथावणी दिली. लष्कर दहशतवाद्याचा हा व्हिडिओ उघड झाल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानी भूमीवरून दहशतवादाला होणारा हा उघड प्रचार पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांना आळा घालण्याच्या इस्लामाबादच्या दाव्यांचा पर्दाफाश करतो.

लष्कर-ए-तोयबा त्यांच्या ‘काश्मीर मोहिमे’पासून कधीही मागे हटणार नाही. आम्हाला दहशतवादी म्हणणाऱ्या आणि आमच्यावर निर्बंध लादणाऱ्यांनी ऐकावे, आम्ही काश्मीर आणि पॅलेस्टाईनच्या मुक्ततेच्या मोहिमेपासून कधीही मागे हटणार नाही, अशी दर्पोक्तीही त्याने केली.