
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय़ संघांमध्ये आज सराव लढत होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या ‘सुपर 12’ फेरीला शनिवारपासून सुरुवात होणार असून त्याआधी दोन्ही संघांकडे सरावाची अखेरची संधी असणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया व अॅरोन फिंचचा ऑस्ट्रेलियन संघ आज भिडणार असून याप्रसंगी दोन्ही संघांकडे पर्यायांची चाचपणी करण्याची शेवटची संधी असणार आहे.
वॉर्नरचा फॉर्म चिंतेचा विषय
ऑस्ट्रेलियाने सलामीच्या लढतीत न्यूझीलंडला पराभूत केले. पण या लढतीत डेव्हिड वॉर्नरला आपली धमक दाखवता आली नाही. आयपीएलमधील सुमार फॉर्म त्याचा कायम राहिला. यामुळे कांगारूंच्या गोटात चिंतेचे वातावरण असेल. पण अॅडम झाम्पा, केन रिचर्डसन यांनी गोलंदाजीत ठसा उमटवलाय. याकडेही ऑस्ट्रेलियन संघ आशेने बघू शकतो.
शार्दुल, जाडेजा, वरुणला चान्स
पहिल्या लढतीत रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, रवींद्र जाडेजा व वरुण चक्रवर्ती यांना सरावाची संधी मिळाली नाही. त्यामुळे साहजिकच आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या लढतीत या चौघांनाही खेळपट्टीवर उतरण्याची संधी मिळेल. भुवनेश्वरकुमार व राहुल चहर यांना पहिल्या लढतीत सपाटून मार खावा लागला होता. तसेच सूर्यकुमार यादवच्या बॅटमधूनही धावा निघाल्या नव्हत्या. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीतील लढतींमध्ये टीम इंडियाच्या अंतिम अकरामध्ये कोणाला संधी देण्यात येते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हार्दिक पांडय़ाबाबत साशंकता कायम
हिंदुस्थानी संघाने पहिल्या सराव लढतीत इंग्लंडला हरवले. पण या लढतीत हार्दिक पांडय़ाला अद्याप म्हणावा तसा सूर गवसला नाही हे प्रकर्षाने दिसून आले. तसेच त्याने आयपीएलप्रमाणे याही लढतीत गोलंदाजी केलेली नाही. फक्त फलंदाज म्हणून त्याला संघात ठेवायचे म्हटल्यास टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. टी-20 वर्ल्ड कपच्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या फेरीत पांडय़ाने गोलंदाजी केली नाही तर हिंदुस्थानला पाच गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागेल. अन्यथा अष्टपैलू शार्दुल ठाकूर किंवा अष्टपैलू फिरकी गोलंदाजाला संघात संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या लढतीतील हार्दिक पांडय़ाची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.

























































