अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार; अशोक सराफ, रहमान, रुपकुमार राठोड यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार

या वर्षीचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ए. आर. रहमान, अशोक सराफ, रुपकुमार राठोड आदींना घोषित झाले आहेत. पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते येत्या 24 एप्रिल रोजी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात सायंकाळी 6.30 वाजता होईल.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांना पुरस्कार दिले जातात. ‘प्रभुपुंज’ येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत मंगेशकर कुटुंबीयांनी या पुरस्कारांची घोषणा केली. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, गायक रुपकुमार राठोड, हृदयेश आर्टचे अविनाश प्रभावळकर, हरीश भिमाणी आदी उपस्थित होते. यावेळी हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘मास्टर दीनानाथजींचे गायक, संगीतकार आणि रंगमंच कलाकार म्हणून अतुलनीय योगदान असून महाराष्ट्र आणि देशभरातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ मंगेशकर परिवार दिग्गजांना सन्मानित या पुरस्कारांचे आयोजन करते. या पुरस्कारांसाठी आम्हाला जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळाल्याचा आनंद आहे.’

पुरस्कार याप्रमाणे…

मोहन वाघ पुरस्कार – गालिब नाटक (उत्कृष्ट नाटय़निर्मिती 2023-24)
आनंदमयी पुरस्कार (आशा भोसले पुरस्कृत) – दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल ( समाजसेवा)
वाग्विलासिनी पुरस्कार – मंजिरी फडके (प्रदीर्घ साहित्य सेवा)
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – अशोक सराफ (प्रदीर्घ नाटय़-चित्रपट सेवा), पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा), रुपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा), अतुल परचुरे (प्रदीर्घ नाटय़ सेवा), रणदीप हुडा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती).

लतादीदींनी सांगीतिक मानवंदना

पुरस्कार वितरणानंतर भारतरत्न लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना देणारा ‘श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी’ हा कार्यक्रम भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर सादर करतील. हृदयेश आर्टचे अविनाश प्रभावळकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये विभावरी आपटे-जोशी (एकल संगीत मैफल), वाद्यवृंद सहकलाकार विवेक परांजपे, केदार परांजपे, विशाल गंडूतवार, डॉ. राजेंद्र दुरकर, प्रसाद गोंदकर व अजय अत्रे सहभागी होतील.