तेरे सूर और मेरे गीत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पद्मश्री पद्मजा फेणाणी – जोगळेकर

‘भारतरत्न’ दीदींची अनेक अद्वितीय गाणी ऐकताना कानात देव, मनात देव, रोमारोमांत देव आणि डोळय़ांतून फक्त अश्रूधारा अशी माझी अवस्था असते. या दैवी सुरात परमेश्वराप्रत क्षणार्धात नेण्याचं सामर्थ्य आहे. अशा दीदींच्या गाण्यांचा अभ्यास करून त्यांना नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त ‘मानवंदना’ म्हणून माझ्या आयुष्यातील ‘खजाना’ मी ‘यू टय़ूब’वर रसिकांसमोर आणतेय. रसिक त्याचा आनंदाने आस्वाद घेतील याची खात्री आहे.

माझे गुरू आदरणीय ‘पद्मश्री’ पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रोत्साहनामुळे व माझ्या वादकांच्या आग्रहामुळे मी दीदींच्या पंच्याहत्तरीला दीदींना मानवंदना म्हणून ‘तेरे सूर और मेरे गीत’ या कार्यक्रमास सुरुवात केली. दीदींनी अप्रतिम गायलेल्या गाण्यांना, त्यांच्याव्यतिरिक्त कुणी स्पर्शू नये असे वाटायचे, म्हणून दोन वर्षे मी नकार देत होते. परंतु साक्षात स्वरसम्राज्ञीने अमेरिकेतील ‘इंडिया अब्रॉड’ला दिलेल्या मुलाखतीत ‘तरुण पद्मजात मला स्पार्क जाणवतो. अत्यंत प्रतिभावान असलेली, दुर्मिळ स्वरूपाचा स्वर लाभलेली पद्मजा ‘माझे ‘आशास्थान’ आहे’ असं म्हटलं. ‘या शब्दात दीदींनी तुझं कौतुक केल्यामुळे तू त्यांना गाण्यातून मानवंदना दे’. वादकांच्या अशा आग्रहामुळे मी सर्व गाणी, मूळ सौंदर्यगाभा न बदलता माझ्या शैलीत गायचे ठरवले. माझ्या बालपणी दीदींच्या ज्या गाण्यांचे संस्कार झाले तसेच जी सहसा वाद्यवृंदात गायली जात नाहीत, त्यातले ‘कहीं ये वो तो नहीं’ हे गाणे तर हृदयनाथजींचे खूप आवडते, म्हणून ते माझ्याकडून नेहमी गाऊन घेत आणि सांगत, ‘यातला ‘वो’ म्हणजे साक्षात ‘परमेश्वरच’ मला दिसतो.’

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीदींचा आशीर्वाद घेतेवेळी ‘तेरे सूर और मेरे गीत’ हेच नाव का ठेवलं? अशी दीदींनी पृच्छा केल्यावर, त्यांचा छोटासा गुलाबी, मऊशार हात हाती घेऊन मी म्हटलं, ‘धडकन में तू है समाया हुआ, खयालों में तू ही तू छाया हुआ, दुनिया के मेले में लाखों मिले, मगर तू ही तू दिल को भाया हुआ’ ही माझी तुम्हांप्रति भावना आहे. मधाळ सुरांनी काळीज कापणाऱया गाण्याचं हेच मोहीत करणारं रहस्य आहे.’
दीदींनी मला, ‘कोणकोणते संगीतकार गाणार?’ असे विचारल्यावर मदनमोहन, पं. रविशंकर, जयदेव, सलील चौधरी, आर. डी., खय्याम, श्यामसुंदर इ. नावे ऐकून दीदींना आनंद झाला. त्यांनी मला पाठीवरून हात फिरवून भरभरून आशीर्वाद दिला.

गाणी बसवताना दीदींच्या गायनाने आणि संगीतकारांच्या कलाकृतींनी मला गर्भश्रीमंत केले. उत्तमोत्तम काव्यांवर चढवलेल्या स्वरसाजाने मढवलेले कलाकृतींचे दागिने मी अत्यंत बारकाईने अभ्यासले. तोच मूळ सौंदर्यगाभा ठेवून माझ्या शैलीने ही गाणी अधिकाधिक कशी खुलतील याचा मी प्रयत्न केला. ही गाणी अत्यंत आव्हानात्मक, कठीण असल्याने त्यातील स्वर, ताल, लय, भाव प्रकटताना प्रत्येक क्षणाक्षणाला झोकून द्यावे लागते आणि त्याच क्षणी जागरूकही राहावे लागते ही त्यातली खरी गंमत आहे. ‘तू जहां जहां’सारख्या गाण्यात मी नंद रागाची बंदिश सादर करते, तर ‘भारतरत्न’ पं. रविशंकरांनी ‘कैसे दिन बीतें’ गाण्यात शुद्ध आणि तीक्र मध्यम, सौंदर्यपूर्णरीत्या कसे वापरले आहेत हे गाऊन व्यक्त करते. ‘जाने कैसे सपनों में’ या गाण्यामध्ये लयीची मजा काही औरच! जयदेवजींच्या ‘प्रभू तेरो नाम’ गाण्याच्या जागा तर अफाट कलाकुसरीच्या आहेत.

अशाच ‘तेरे सूर…’च्या एका कार्यक्रमात प्रख्यात सेक्सोफोनवादक मनोहारीदा समोरच बसले होते. भारावून उत्स्फूर्तपणे स्टेजवर येऊन त्यांनी माझ्यासोबत ‘अजि रुठकर अब…’ सॅक्सोफोनवर वाजवून खूपच गंमत आणली. त्यांनीही कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. ‘बऱयाच दिवसांनी इतक्या बारकाईने, अभ्यासपूर्ण आणि अप्रतिमरीत्या गाणी ऐकवलीत’ अशी मनःपूर्वक दादही दिली आणि आशीर्वादही!