
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व मतदान पथके आज संबंधित तालुका स्तरावरून रवाना झाली. तसेच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने आवश्यक सज्जता केली आहे. जिल्ह्यात एकूण ५९ जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी २४२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून १० पंचायत समित्यांच्या ११८ गणांमध्ये ४१९ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. जिल्ह्यात एकूण १४ लाख ९१ हजार १४९ मतदार असून, यामध्ये ७ लाख ८२ हजार ५१४ पुरुष आणि ७ लाख ८ हजार ६२२ महिला व १३ इतर मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ७४७ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी १ हजार ७४७ मतदान पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे. सर्व केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, शेड आणि स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा राहणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ७४७ बॅलेट युनिट आणि १ हजार ७४७ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदान यंत्रावर जिल्हा परिषद गटाकरिता पांढऱ्या रंगाची तर पंचायत समिती गणाकरिता गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे.





























































