लातूरमधील अहमदपूर बसस्थानकामध्ये सुविधाचा अभाव, प्रवाशांचे हाल 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदपुर येथील बसस्थानकामधील असुविधामूळे जनतेसह प्रवाशांची हेळसांड होत आहे. त्यामूळे बसस्थानकामध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

अहमदपूर तालुक्यातील वाडी तांड्यासह 124 गावांचा दररोज संपर्क येत असतो. रत्नागिरी – नागपूर 365 क्रमांकाचे राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्यामूळे येथे सतत वाहनांची वर्दळ असते. येथील बसस्थानकामध्ये सुविधांचा अभाव असल्यामूळे प्रवाशांना याचा फटका बसत आहे.

बसस्थानकाला पावसाळ्यामध्ये पूर्णता: गळती लागत असून प्रवाशांनी आपला जीव मुठीत धरुन थांबावे लागते तसेच सोडून दिलेल्या मोकाट जनावरे जास्त प्रमाणात बस स्थानकामध्ये बसून घाण करत असतात. त्यामूळे अशा घाणी मध्येही प्रवाशांना बसची वाट पहात बसावे लागते. बसस्थानकातील पंखे संपूर्ण बंद असून उन्हाळ्यामध्ये प्रवाशांना  त्रास सहन करावा लागत असतो. तसेच बसस्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. प्रवाशांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्या आसन व्यवस्थेच्या फरशी निघून गेल्या आहेत. त्यामूळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

नगरपालिकेच्या मालकीचे शौचालय नसल्यामूळे शहरामध्ये येणारे अनेक व्यक्ती बसस्थानक परिसरामध्ये लघुशंकेसाठी येतात. तसेच लहान मोठे व्यापारी आपल्या दुकानातील कचरा बसस्थानक परिसरामध्ये टाकतात त्यामूळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली दिसून येते.

रस्त्याच्याकडेला व्यवसाय करणारे हातगाडेवाले बसस्थानक परिसरात कचरा टाकतात. त्यामूळे नगर पालिकेला वारंवार सांगूनही हा कचरा उचलला जात नाही. ग्रामीण भागाची वाहिनी असलेल्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असताना खिळखिळ्या बसेसमुळे प्रवासी एसटीकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसत आहे.