लातूरकरांची पाण्यासाठी दैना! पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागणार

683

कायम दुष्काळी जिल्हा म्हणून राज्यात ओळख निर्माण झालेल्या लातूरची यावर्षी पुन्हा पावसाअभावी पाण्यासाठी दैना उडणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. … कोणी पाणी देता का पाणी ! असे म्हणण्याची वेळ यावेळी सबंध लातूर जिल्ह्यावरच येणार आहे. मांजरा धरणाने तळ गाठला असल्याने आता प्रशासन रेल्वेच्या पाणी पुरवठ्याकडे लक्ष देणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे. 4 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या लातूर शहरातील नागरीकांसोबतच यावेळी जिल्ह्यातील इतर ठिकाणीही तीव्र पाणी टंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे.

सन 2016 मध्ये लातूर शहरास रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. मिरज येथून लातूरसाठी रेल्वेने पाणी आणले गेले. मांजरा धरण त्यावेळीही कोरडे पडलेले होते. परंतू त्या दुष्काळाची तीव्रताही आजच्या पेक्षा कितीतरी पटीने कमी होती. कारण लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाणी उपलब्ध होते. यावर्षी तशी स्थिती कुठेच नाही. जिल्ह्यातील सर्वच मध्यम प्रकल्प, लघू पाटबंधारे प्रकल्प, गाव तलाव, साठवण तलाव, बॅरेजेस कोरडे ठणठणीत आहेत. केवळ लातूर शहरास रेल्वेने पाणी पुरवठा झाला तरी सबंध जिल्ह्याचे काय हा प्रश्न सर्वांना सतावणारा आहे.

लातूर शहरास पुन्हा एकदा रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील नियोजन तर केले जात आहेच परंतु धाराशीव येथून उजनी धरणाचे टँकरद्वारे पाणी उपलब्ध करण्यासंदर्भातही नियोजन केले जात आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी रेल्वेच्या पाणी पुरवठ्यासाठी जागेवर जाऊन पाहणी करावी असे आदेशही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिलेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या