लातूर शहराला निम्न तेरणामधुन पाणी पुरवठा

457

लातूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई असली तरी लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होणार नाही. रेल्वेने पाणी पुरवठा हा शेवटचा प्रयत्न राहणार आहे. निम्न तेरणा प्रकल्पात पाणीसाठा झालेला असून त्यामधून लातूर शहरास पाणी पुरवठ्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.

लातूर जिल्ह्यातील पाण्याच्या टंचाई संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात 19 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा झालेला आहे. लातूरसाठी तो मोठा आधार असून आचारसंहितेची अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईला प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

धनेगाव येथील मांजरा धरणात अद्याप पाणीसाठा झालेला नाही. सध्या मृतसाठ्यातील 3.7 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा आहे. या प्रकल्पामधून होणारा एमआयडीसी मधील पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. हा पाणी पुरवठा अचानकपणे बंद करण्यात आलेला नाही. उद्योजकांची बैठक घेऊनच हा निर्णय झालेला आहे असेही त्यांनी सांगितले. शहरात होणारी बांधकामे कोणत्याही स्थितीमध्ये बंद होणार नाही. शहरातील पाण्याचे रिसायकलींग करून ते पाणी बांधकामासाठी वापरता येऊ शकते. बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे बांधकाम बंदीचा निर्णय घेण्यात येणार नाही असेही त्यांनी सांगितले. यावर्षी मोठा पाऊस झालेला नाही. पण पावसाच्या दिवसांमध्ये चांगली वाढ झालेली आहे. मोठा पाऊस पडेल अशी अपेक्षा करुया, असेही त्यांनी सांगितले.

2016 मध्ये लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. रेल्वेने पाणीपुरवठा यावेळी केला जाणार नाही. तो शेवटचा प्रयत्न राहील. अहमदपूर, माजलगाव येथूनही टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या