
लातूर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे सात रुग्ण वाढले आहेत. आठ जणांचे अहवाल अनिर्णीत आले आहेत. लातूरकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे चित्र यामुळे दिसून येत असून तपासणी अहवाल अनिर्णीत येण्याचे प्रमाण वाढतच आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत घेण्यात आलेल्या 23 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती भोई गल्ली लातूर येथील असून एक व्यक्ती सुतमिल रोड लातूर येथील आहे व एक व्यक्ती माळकोंडजी ता. औसा येथील आहे. महानगरपालिके कडून तापसणीसाठी आलेल्या स्वॅब पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ती व्यक्ती जुनी कापड लाईन लातूर येथील आहे . एक पॉझिटिव्ह रुग्ण उदगीर येथील आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
3 जूनला रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील एकाच कुटुंबातील 50 व 40 वर्ष वयाचे दोन्ही रुग्ण या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी एका रुग्णास मधुमेह होता व दोघेही 12 दिवस अतिदक्षता विभागात होते. त्या दोन्ही रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांची आज रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे अशी माहिती डॉ. गजानन हलकंचे, कोरोना विलगीकरन कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैदकशास्त्र डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.
मृतांचा आकडा 11 वर पोहोचला
प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवणा अंतर्गत येणाऱ्या जळकोट तालुक्यातील एकुरगा येथील रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या यामुळे 11 वर पोहोचली आहे.

























































