
लातूरमध्ये पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि काडतुसे बाळगणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि 17 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आलोक विश्वनाथ चौधरी (वय – 36, रा. आंबा हनुमान जवळ, अंबाजोगाई रोड, लातूर) असे आरोपीचे नाव आहे.
आगामी सण-उत्सव काळात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणारे, रेकॉर्डवरील गुन्हेगार, शरीराविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार, अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती काढून कार्यवाही करण्याबाबत जिल्हाभरात कार्यवाही सुरू आहे. याच दरम्यान, पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक पोलीस पथक पोस्टे हद्दीत गस्त घालत असताना नवीन रेणापूर नाका ते डीमार्ट रोडवर एका व्यक्तीकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सापळा रचत आरोपी विश्वनाथ चौधरीला अटक केली. त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व 17 जिवंत काडतुसे मिळून आले. या कारवाईत एकूण 1,93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर हे करीत आहेत. ही कामगिरी सचिन रेडेकर पोलीस अंमलदार, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, रणवीर देशमुख, गणेश यादव, धैर्यशील मुळे, सचिन राठोड, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.