लातूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा हल्ला

663

लातूर जिल्ह्यात या वर्षी परतीच्या समाधनकारक पावसामुळे रब्बी हंगामात रब्बी ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला असून ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मीवर्म – स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डां) प्राधुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात मक्यावर आढळून आलेल्या या अमेरिकन लष्करी अळीने आता रब्बी ज्वारीकडे मोर्चा वळवला आहे. ही अळी ज्वारीचे पाने कुरतडून पोंग्यामध्ये शिरते व त्यामुळे तिच्या विष्ठेमुळे पानांची प्रत खराब होते. या किडीची पतंग एकावेळी 1 हजार अंडी पुंजक्यात देते. त्याचबरोबर एका रात्री मध्ये एक पतंग 10 किलोमीटर अंतर पार करून जातो त्यामुळे अळीचा प्रसार खूप वेगाने होतो. सद्यस्थितीत जिल्ह्यामधे वेगवेगळ्या कालावधीत पेरणी झाली असल्यामुळे जीवनक्रमातील वेगवेगळ्या अवस्थेतील अळीस पोषक वातावरण मिळत आहे.

या परिस्थितीत पिकाचे संरक्षण करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी प्रादुर्भाव वेळेवर ओळखणे गरजेचे असून ज्वारीच्या पिकाची दररोज निरीक्षणे घ्यावीत. प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर व्यवस्थापणासाठी सर्वप्रथम पानावरील अंडीपुंज व प्रादुर्भावग्रस्त पोंगे नष्ट करावीत व शिफारशी नुसार स्पिनेटोराम 11.07% एससी 0.5 मिली/लिटर पाण्यात किंवा थायमेथॉक्झाम 12.6 % + लॅम्बडा सायलोथ्रिन 9.5 % 0.25 मिली/लीटर किंवा क्लोरानट्रानिलिपरोल 18.5 % एससी 0.4 मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे अवाहन कृषि विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ प्रा. संदीप देशमुख यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या