जिवापाड जपलेल्या फळबागा जळू लागल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अहमदपूर

तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई या कारणामुळे फळबागांवर मोठा परिणाम होत आहे. पाण्याअभावी फळझाडे जळत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

तालुक्याची डोंगराळ भाग म्हणून ओळख आहे. गेल्या चार – पाच वर्षापासून निसर्गाची अवकृपा होत असल्याने फळबाग शेती लागवड केलेल्या शेतकऱ्यांपुढे पाण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. शेतकऱ्यांच्या या फळबागांना दुष्काळाचे ग्रहण लागले असून लागवडीपासून ते फळ लागवड होण्यापर्यंत लाखो रुपये खर्च असलेल्या फळबागेवर संकट कोसळले आहे. विहीर, तलाव, बोअर कोरडे पडल्यामुळे बागा जळून जात आहेत. 1972 ची पुनरावृत्तीची आठवण शेतकऱ्यांना होत आहे. पाण्याअभावी जळत असलेल्या फळबागा डोळ्यादेखत जळत असताना कांहीच करता येत नाही, अशी अवस्था फळबाग उत्पादकांची झाली आहे.

हडोळती येथील फळबाग शेतकरी व्यास विश्वनाथ जोशी यांच्याकडे तीन एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी पंधरा वर्षापूर्वी मोसंबी 90, आंबा 50 डाळींब 40 व सिताफळाची लागवड केली. या फळबागांना पुरातन विहीरीतून पाणी पुरवले जात होते. या विहीरीतून पूर्वी आख्या गावाला पाणी उपलब्ध व्हायचे. पण कालांतराने पर्जन्यमान कमी होत असल्यामुळे विहीरीची पाणी पातळी घटली आहे. यंदा ही विहीर चक्क कोरडी पडली आहे. त्यामुळे हा शेतकरी संकटात सापडला आहे. पंधरा वर्षापासून जीवापाड सांभाळलेली ही बाग आता मोडायची वेळ आली आहे. आता ही बाग तोडायची म्हटले तर रानाची दुरुस्ती खर्च येणारच व्यास जोशी सर्वच्या सर्व तीन एकरमध्ये बागायत आहेत. त्यात मोसंबीची बाग तर नष्ट झाली असून वाळून गेली आहे. जी बाग त्यात आंबा, सिताफळ थोडीफार जिवंत आहे त्यांना पाण्याची नितांत गरज आहे.

तीन एकर वरील मोसंबी, आंबा, डाळींब, 180 झाडे पाण्यावाचून जळाली आहेत. वर्षानूवर्ष विहिरीतील पाण्याची पातळी घटत असतानाच पंधरा वर्षापासून लाखो रुपये खर्च करून शेणखत, फवारणी, मशागत करून जगवलेली झाडे या वर्षाच्या भीषण टंचाईने विहीर आटली. पूर्वी गावाला दुष्काळात या विहिरीचा आधार होता व सर्व दुष्काळात विहीरीने साथ दिली. पण या वर्षीच्या भीषण टंचाईने विहीर कोरडी पडली व फळबाग वाळून गेल्याची खंत व्यक्त करत प्रशासनाने फळबागेची पाहणी करून फळबाग उत्पादकाची दखल घ्यावी, अशी मागणी व्यास जोशी यांनी सामनाशी बोलताना केली.