लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा बारावीचा निकाल 89.79 टक्के

1142
प्रातिनिधिक फोटो

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. लातूर विभागाचा निकाल 89.79 टक्के लागला आहे. लातूर विभागात मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण तब्बल 94.05 टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 86.46 टक्के आहे. लातूर विभागात सर्वाधिक निकाल हा लातूर जिल्ह्याचा आहे. लातूर जिल्ह्याचा निकाल 92.61 टक्के , नांदेड जिल्ह्याचा निकाल 87.94 टक्के तर धाराशिव जिल्ह्याचा निकाल 87.86 टक्के लागला आहे.

लातूरमधून बारवीच्या परिक्षेसाठी 86,582 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 85,569 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 76832 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल 89.79 टक्के लागला आहे. लातूर जिल्ह्यातील 295 महाविद्यालयातील 34078 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधील 31561 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वाधिक 92.61 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील 263 महाविद्यालयातील 36386 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधील 31999 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्याचा निकाल 87.94 टक्के लागला आहे. धाराशिव जिल्ह्यातील 143 महाविद्यालयातील 15105 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधील 13272 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 87.86 टक्के लागला आहे.

लातूर विभागामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 95.92 टक्के, कला शाखेचा निकाल 82.65 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 93.70 टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 83.28 टक्के एवढा लागला आहे. लातूर विभागामध्ये विशेष प्राविण्यासह उत्तर्णी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 7284 एवढी आहे. तर प्रथम श्रेणीत 32815 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत 35212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 1521 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. लातूर विभागात मुलीच अव्वल आहेत. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 94.05 टक्के असून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 86.46 टक्के आहे. विद्यार्थ्यांना उद्यापासून गुणपडताळणी अर्ज करता येणार आहे. 27 जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. प्रति विषयास 50 रुपये शुल्क ठेवण्यात आलेले आहे. छायांकित प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे लागतील. प्रति विषयासाठी 400 रुपये शुल्क भरावे लागेल. पुनर्मूल्यांकनासाठी 300 रुपये शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या