
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदारसंख्या असणारा मतदारसंघ म्हणून लातूर शहर विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. तब्बल 3 लाख 72 हजार 21 मतदार लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार ठरवणार आहेत. 4 तारखेपर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार असल्यामुळे यात आणखी कांही मतदार वाढण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, लातूर शहर विधानसभा मतदारसंघ, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ, उदगीर विधानसभा मतदारसंघ, निलंगा विधानसभा मतदारसंघ आणि औसा विधानसभा मतदारसंघ अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 19 लाख 14 हजार 669 मतदारसंख्या आहे. त्यापैकी सर्वाधिक मतदारसंख्याही लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 194149 तर महिला मतदारांची संख्या 177766 असून एक इतर मतदार आहे. 105 सैनिक मतदारही आहेत.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानासाठी 326 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर 8 सहाय्यक मतदान केंद्रही आहेत. एकूण 334 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क मतदारांना बजावता येईल.

































































