
लातूर ते रेणापूर रस्त्यावर वाहन अडवून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच आरोपींकडून 9.4 तोळे सोन्याचे दागिने (किंमत 6 लाख 76 हजार) जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे रेणापूर हद्दीमध्ये लातूर ते रेणापूर रोडने जाणाऱ्या रोड वरील बोरवटी गावा जवळ अज्ञात आरोपींनी कारमधून जाणाऱ्या दांपत्याना अडवून त्यांना धमकी व धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पोलीस ठाणे रेणापूर येथे कलम 309(4), 351(2), 351(3), 3(5) भारतीय न्याय संहिता व 392, 32 भादवी प्रमाणे 2 गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी सखोल तपास केला असता शुक्रवारी (17 जानेवारी 2025) राहते येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांनी चोरलेले 9.4 तोळे वजनाचे 06 लाख 76 हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अमोल सुभाष राठोड (वय 27 वर्ष), अभय उर्फ राहुल संतोष चव्हाण (वय 21 वर्ष) आणि कृष्णा राजूभाऊ ढमाले (वय 25 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.





























































