
लातूर शहरातील औसा रोड भागातील आयसीआयसीआय बँकेसमोर कार थांबवून रक्कम काढण्यासाठी संबंधित व्यक्ती बॅंकेत गेली. यानंतर त्याच्या गाडीतील तब्बल 30 लाखांची रोकड अज्ञाताने पळवल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेतली. आणि घटनास्थळी तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या बॅंकांमधून रोकड काढण्याचे काम या गाडीद्वारे सकाळपासून सुरू होते. यानुसार शहरातील दोन बॅंकांमधून रोख रक्कम काढण्यात आली होती. त्यानंतर तीच गाडी चाकूर येथील एका बॅंकेतून रक्कम काढण्यात आली होती.
औसा रोडवरील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतून रोकड काढण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने गाडीची काच फोडली आणि आतील 30 लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला. सदरील चोरटा दुचाकीवर असल्याचे काहीजण सांगत होते. सकाळपासून सदरील गाडीवर पाळत ठेवून हे काम करण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.