
चाकूर-शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीवरील पुलाखाली सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून पतीनेच साथीदारांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फरीदा खातून असे मयत महिलेचे नाव आहे. फरीदा पती जिया उल हक यास पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून चार साथीदारांच्या मदतीने त्याने पत्नीची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून तिरु नदीवरील पुलाखाली फेकला. यानंतर जियाने उदगीर पोलीस ठाणे गाठत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अज्ञात महिलेची ओळख पटवण्यासाठी बेपत्ता महिलांची माहिती गोळा केली. मयत महिलेचे रेखाचित्र काढून सर्व पोलीस ठाण्यात देण्यात आले. यादरम्यान उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी जिया हा पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आला होता. जियाने दिलेला पत्नीचा फोटो आणि अज्ञात महिलेचे छायाचित्र यात साम्य दिसून आले. यानंतर पोलिसांनी जियाची सखोल चौकशी केली.
चौकशीत जियाने पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी जियासह त्याचे साथीदार सज्जाद जरूल अन्सारी, अरबाज जमलू अन्सारी, साकीर इब्राहिम अन्सारी, आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू यांना अटक केली.