
रविवारी (4 मे 2025) रोजी होणाऱ्या NIIT परीक्षेच्या आदल्या दिवशी लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेला हा विद्यार्थी बीड जिल्ह्यातील आहे. नीट परिक्षा पुन्हा देण्यासाठी तो तयारी करत होता पण परिक्षेच्या एक दिवस अगोदर त्याने आत्महत्या केली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. अनिकेत अंकुश कानगुडे असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
लातूर जिल्ह्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी लातूरमध्ये शिक्षणासाठी येत असतात. सध्या डॉक्टर व इंजिनियर्स होण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लातूर येथे अनिकेत अंकुश कानगुडे हा मागील दोन वर्षांपासून मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग क्लासेस येथे नीटची तयारी करत होता. मागील वर्षी झालेल्या परिक्षेत अनिकेतला 520 गुण मिळाले होते. मात्र वैद्यकीय प्रवेश मिळाला नाही. पुन्हा तो नीट परीक्षेची तयारी करत होता मात्र परीक्षेच्या एक दिवस आधीच, त्याने लातूरमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे.
हा बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रुई धानोरा येथील रहिवाशी आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमकं कारण समजले नाही. पण परिक्षेच्या ताणामुळे त्याने आत्महत्या केली असावी असे सांगितले जात आहे. पोलिस तपास करत आहेत.