
उदगीर येथील शासकीय धान्याच्या गोदामात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ करत चोरी केल्याची घटना घडली आहे . दोन आरोपींनी शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी असलेल्या शासकीय गोदामातील स्वस्त धान्याची चोरी केली आहे. नंतर या धान्याची समोरच्या दुकानात विक्री देखील केली. याप्रकरणी तिघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , शनिवारी ( ता .9 ) सायंकाळी चारच्या सुमारास प्रशांत मनोहर जाधव ( रा.गांधीनगर ) व भीमा तुळशीराम वाघमारे ( रा.एसटी कॉलनी ) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी असलेल्या शासकीय गोदामाजवळ येऊन गोदामाचे कुलुप तोडून कर्तव्यावर असलेले वाचमन मोहम्मद हाजी बागमारू ( वय – 55 ) याना चाकुचा धाक दाखवुन शिवीगाळ दमदाटी केली .
नंतर शासकीय कामात अडथळा करत जबरदस्तीने 120 किलो गहू ज्याची किंमत 2510 रूपये व 30 किलो गहु ज्याची किंमत नऊशे रूपये असा एकुण 3510 रुपयांचा माल चोरी करून समोरच्या काचवावार याच्या दुकानात विकला आहे . वॉचमन बागमारू यांच्या फिर्यादीवरून चोरी केलेले दोन आरोपी व स्वस्त धान्य विकत घेणारा दुकानदार अशा तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली . या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी पहाटेच तिन्ही आरोपींना अटक केली आहे . यासाठी राजीव घोरपडे , श्रीकृष्णा चामे , योगेश फुले अदीनी पुढाकार घेतला . या आरोपींना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .




























































