
गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांचा ‘लावण्यवती’ हा नवीन अल्बम आला आहे. याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. यातील घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि नर्तिकांच्या नजाकतींमुळे या अल्बमविषयीची उत्सुकता वाढली होती. ‘लावण्यवती’तील ‘गणराया’ ही श्रीगणेशाला वंदन करणारी पहिली लावणी प्रदर्शित झाली आहे. यामध्ये नृत्यांगना भार्गवी चिरमुले आपल्या अदाकारीने भुरळ घालताना दिसत आहे. या गाण्याचे गीतकार-संगीतकार अवधूत गुप्ते आहेत. गायिका वैशाली सामंत यांनी हे गाणे गायले आहे.
‘लावण्यवती’बद्दल अवधूत गुप्ते म्हणाले, ‘‘लावणी नाही कापणी’ अशी या ‘लावण्यवती’ची टॅगलाइन आहे, तर अनेकांना हा प्रश्न आहे, याचा नेमका अर्थ काय? तर हा अल्बम पाहून, ऐकून याचा उलगडा होईल. चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी श्रीगणेशाने करायची असते. म्हणूनच या अल्बममधील पहिले पुष्प म्हणजेच ‘गणराया’ गीत तुमच्या भेटीला आले आहे. ‘लावण्यवती’ या अल्बममध्ये वेगळ्या धाटणीची चार गाणी आहेत. आमचा हा नवीन प्रयत्न संगीतप्रेमी आणि नृत्यप्रेमींना नक्कीच भावेल.’’