राज्यातील जातीय तणावाची उच्चस्तरीय चौकशी करा! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून धर्मांध प्रवृत्तीच्या समाजपंटकांकडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने या प्रकरणात लक्ष घालून या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्राला संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबा यांच्यासह महात्मा चक्रधर आदी सकळ संताची परंपरा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आहे. अशा कितीतरी महान विभूतींनी घडविलेल्या महाराष्ट्रात सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून काही असामाजिक प्रवृत्तींकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून धर्मांध प्रचार करून दंगली घडविण्याचे प्रकार सुरू आहेत. दररोज एका शहरात दंगल घडविण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे राज्यात अशांतता तसेच दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यपाल म्हणून आपण याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यात जातीय सलोखा पाळण्याचा राज्याचा इतिहास असला तरी गेल्या अडीच ते तीन महिन्यांत विशेषतः या आठवडयात राज्याच्या विविध शहरांमध्ये जातीय तणाव किंवा हिंसाचाराच्या आठपेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी अचानक औरंगजेबाचे पह्टो लावून उदात्तीकरण केले गेले आणि त्यातूनही जातीय तणाव वाढीस लागला असेही दानवे यांनी निदर्शनास आणून दिले. पोलीस जरी त्यांचे काम करत असले तरी या सर्व घटना रोखण्यात सरकारलाही अपयश येत असल्याचे ते म्हणाले.

दोषींवर कठोर कारवाई करा
राज्याचे प्रथम नागरिक म्हणून आपण या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.