
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या उन्हाळी सत्राच्या विधी शाखेच्या अंतिम वर्षाच्या सत्र-6 ची परीक्षा 3 मेपासून सुरू होणार आहे. सोशल मीडियावर परीक्षेबाबत व परीक्षा अर्जाबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जात असून विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.
विधी परीक्षा सत्र-6 चे परीक्षा अर्ज विद्यापीठाने भरून घेतले नाहीत. त्यामुळे परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार की नाही अशी अफवा विद्यार्थ्यांमध्ये पसरवली जात आहे. विद्यापीठाने या वर्षापासून तृतीय वर्षाच्या प्रवेशाच्या वेळेसच विद्यार्थ्यांकडून सत्र-5 व 6 चे परीक्षा शुल्क घेतलेले आहे. विद्यार्थ्यांचा सर्व डेटा विद्यापीठाकडे असल्याने नियमित विद्यार्थ्यांना स्वतंत्र परीक्षा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. फक्त पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाच परीक्षा अर्ज करावा लागतो. नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले आहे.

























































